मास्कमुक्त इस्त्राईलमध्ये चेंगराचेंगरीत 28 जणांचा मृत्यु; 50 हून अधिक गंभीर जखमी

तेलअवीव :- कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर मास्कमुक्त देश असलेल्या इस्त्राईलमधील उत्तर भागात सुट्टीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात चेंगराचेंगरी होऊन किमान २८ जणांचा मृत्यु झाला असून ५० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत.

उत्तर इस्त्राईलमधील माऊंटन मेरॉन येथे लग बी ओमर सुट्टी साजरी करण्यासाठी सामुहिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी रात्री या मेळाव्यात चेंगराचेंगरी झाली. त्यात लोक सैरावैरा धावू लागले. त्यात २८ नागरिकांचा मृत्यु झाला आहे. मॅगेन डेव्हिड अ‍ॅडॉम यांनी सांगितले की, ६ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ५० जखमींना झिव्ह रुग्णालय आणि नाहारियातील गॅलील मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यातील २० जणांची प्रकृती गंभीर आहे. ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

इस्त्राईलने लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहे. आतापर्यंत एकूण लोकसंख्येच्या ५३ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहे. तेथील मृत्युचे प्रमाण अतिशय कमी झाले असून कोरोना बाधितांची संख्या घटली आहे. त्यामुळे इस्त्राईलमधील शाळा, महाविद्यालये सुरु झाले असून तसेच इतर सर्व निर्बंध हटविण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मास्क वापरावरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता देश पुन्हा सुरळीत सुरु झाला असताना त्यात ही दुर्घटना घडली आहे.