‘त्या’ विद्यापीठात एमबीबीएस प्रवेशासाठी २८ लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारती विद्यापीठात मुला व मुलींना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून २८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रीकांत बापूराव शिर्के (रा. अंबक चिंचणी, ता. कडेपूर, जि. सांगली) आणि मुकेश मधुकरराव धिवार (रा. राजस सोसायटी, कात्रज) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत गोपीनाथ पाटील (वय ४७, रा. प्रोफेसर कॉलनी, देवपूर, धुळे) यांनी फिर्याद दिली आहे.

प्रशांत पाटील हे प्राध्यापक आहेत. त्यांची आरोपींशी ओळख होती. त्यांची मुलगी महिमा हिला एम. बी. बी. एस.मध्ये प्रवेश मिळवून देताे असे सांगून श्रीकांत शिर्के, मुकेश धिवार यांनी त्यांच्याकडून मे २०१६ मध्ये पैसे घेतले होते. परंतु, त्यावेळी त्यांनी अ‍ॅडमिशन मिळवून दिले नाही. त्यानंतर पाटील यांच्या मेहुण्याचा मुलगा मयुर यास बी ए एम एस करीता भारती विद्यापीठामधील कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून एकूण २८ लाख ८१ हजार रूपये घेतले. परंतु, त्यांना अ‍ॅडमिशन मिळवून दिले नाही. तसेच त्यांनी पैशाची मागणी केल्यावर तेही न दिल्याने शेवटी त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली.