भरधाव कंटेनरची एसटीला धडक, 28 जण जखमी; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

खेड (रत्नागिरी) : पोलीसनामा ऑनलाईन – प्रवाशी घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या तुळशी- खेड बसला भरधाव कंटेनरने पाठीमागून जबर धडक दिल्याने बसमधील तब्बल 28 प्रवाशी जखमी झाले आहेत. यात 25 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणीनजीक शनिवारी (दि. 23) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा विचित्र अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणीनजीक तुळशी-खेड एसटी बस (क्र. एमएच.20. बीएल 2580) प्रवाशी घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबली होती. त्यावेळी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कंटेनरने (क्र.-एमएच. 47 बीबी. 4731) एसटीला पाठीमागून जबर धडक दिली. या अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या 46 प्रवाशांपैकी वाहकासह 28 प्रवासी जखमी झाले. यामध्ये अमिषा संतोष पाटील या विद्यार्थिनीला अधिक उपचारासाठी चिपळूण येथे दाखल केले आहे. जखमी विद्यार्थी, वाहक संजय साळवी यास उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच आमदार योगेश कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन विचारपूस केली. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद केली आहे.