महाराष्ट्रातील विदर्भात गीरपिटीचा ‘कहर’ ! अवकाळी पाऊस, गारपीटीने उत्तर प्रदेशात २८ जणांचा बळी

लखनऊ : वृत्तसंस्था – एका बाजूला कोरोना व्हायरस जगभरात धुमाकुळ घालत असताना देशात पाऊस, गारपीटीने थैमान घातले आहे. शनिवारी पहाटे विदर्भात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली असून त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले. उत्तर भारत, मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणावर पाऊस, गारपीट होत आहे. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत आहे.

तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास कोरोना व्हायरस अधिक काळ हवेत जीवंत राहू शकत नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, हवामानातील बदलामुळे देशभरात सध्या अर्धा मार्च सरला तरी उन्हाळ्याऐवजी थंडी, पावसाचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचा धोका कमी व्हावा, यासाठी ऊन वाढावे अशी अपेक्षा लोकांना आहे.

नागपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मध्यरात्री जोरदार गारांसह वादळी पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्यात गारांसह वादळी पावसाला शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरूवात झाली होती. मोहाडी येथे बोराच्या आकाराच्या गारांचा वर्षाव होत होता. आंधळगाव परिसरात वादळासह जोरदार पाऊस सुमारे एक तास सुरु होता. भंडारा शहरात मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

गेल्या २४ तासात उत्तर प्रदेशात तुफान पाऊस, वादळ आणि गारपीटीत कमीतकमी २८ जणांचा मृत्यु झाला. लखीमपूर खिरी आणि सीतापूर येथे प्रत्येकी ६ जण, जौनपूर आणि बाराबंकी येथे प्रत्येकी ३, सोनभद्रमध्ये २ आणि वाराणसी, गोरखपूर, सिद्धार्थनगर, अयोध्या, चंदौली, कानपूर देहात, मिर्जापूर आणि बलरामपूर येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यु झाला आहे.

झाड पत्र्याच्या शेडवर पडल्याने त्याखाली सापडून एका मृत्यु झाला. रामपूरमध्ये भिंत कोसळून त्याखाली दबून एक १५ वर्षाच्या मुलीचा मृत्यु झाला आहे. तर एका ठिकाणी वीज पडल्याने पिता पुत्र यांचा मृत्यु झाला आहे.

राज्यातील या दुदैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषित केली आहे. तसेच पशुधनाच्या मृत्युबद्दलही नुकसान भरपाई देण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.