शिवसेनेला मोठा धक्का ! 28 नगरसेवकांचा एकाच वेळी राजीनामा

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपा यांनी युती जाहीर केली असली तरी ठिकठिकाणी दोन्ही पक्षाला बंडखोरीचा फटका बसताना पाहायला मिळत आहे. शिवसेना बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्यासह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 18 नगरसेवक आणि उल्हासनगरमधील 10 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. नगरसेवकांसह सर्व पदाधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. आमच्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये अशी नगरसेवकांची भूमिका असल्याचे कारण या राजीनाम्यांमागे सांगण्यात आले आहे.

कल्याण पूर्वमध्ये भाजपने गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण पूर्व मतदारसंघ युतीमध्ये भाजपाला सोडण्यात आल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत या मतदारसंघात शिवसेनेचे उल्हासनगर महापालिका विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

2014 मध्ये शिवसेना-भाजपा युती न झाल्याने दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढविली होती.कल्याण पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले गणपत गायकवाड यांनी 777 मतांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव 2014 मध्ये केला होता. या निवडणुकीत गणपत गायकवाड यांना भाजपाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत.

Visit : Policenama.com