Coronavirus : देशात ‘कोरोना’चा कहर सुरूच ! 24 तासांत 551 रुग्णांचा मृत्यू, तर रुग्णांमध्ये पुन्हा ‘रेकॉर्ड’ब्रेक वाढ, जाणून घ्या आकडेवारी

नवी दिल्ली : कोराना रूग्णांच्या संख्येत जगात तिसर्‍या क्रमांकावर पोहचलेल्या भारतात अजूनही कोरानाचा कहर थांबताना दिसत नाही. कोरोना संक्रमितांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडीवारीनुसार मागील 24 तासात देशात 28 हजार 637 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 551 लोकांचा मृत्यू झाला. आता देशातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या 8 लाख 49 हजार 553 झाली आहे. तसेच एकुण 22 हजार 674 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात सध्या 2 लाख 92 हजार 258 सक्रीय रुग्ण असून 5 लाख 34 हजार 620 रुग्ण बरे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सतत वाढत आहे. देशात रूग्ण बरे होण्याचा दर 62.92% आहे तर, सकारात्मकतेचा दर 10.22% आहे.

महाराष्ट्रात बाधितांचा आकडा वाढला
देशात सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीशी महाराष्ट्राला जास्त झुंज द्यावी लागत आहे. शनिवारी राज्यात 8 हजार 139 नवे रूग्ण आढळल्याने एकूण कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून आता एकुण बाधितांची संख्या 2 लाख 46 हजार 600 झाली आहे. तसेच, 10 हजार 116 लोकांचा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1, लाख 36 हजार 985 रुग्ण बरे झाले आहे.

सहा दिवसात वाढले इतके रुग्ण
मागील सहा दिवसात देशात रूग्ण संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 22,000 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात संसर्गाची पहिली 1 लाख प्रकरणे असून ती 110 दिवसांत आली होती. ही संख्या 8 लाखांवर पोहचण्यासाठी केवळ 53 दिवस लागले आहेत. 3 जून रोजी देशातील कोविड – 19 मधील रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा जास्त होती, तर 3 लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी 10 दिवस लागले. तर 8 दिवसांनंतर 21 जून रोजी संक्रमितांची संख्या 4 लाखांहून जास्त होती. पुढील 1 लाख प्रकरणे अवघ्या 6 दिवसांत समोर आल्याने 5 लाखांचा टप्पा ओलांडला गेला आहे. 7 लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी 10 दिवस लागले आहेत.