Coronavirus : राज्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 3693 नवीन रुग्ण, 73 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. शुक्रवारी (दि.8) दिवसभरात 3 हजार 693 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनातून बरे झालेल्या (Coronavirus)  एकूण 2 हजार 890 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 18 लाख 58 हजार 999 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.75 टक्के इतके झाले आहे. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 19 लाख 61 हजार 975 वर पोहचली आहे. सध्या राज्यात 51 हजार 838 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्हरुग्ण पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्यात 13 हजार 718 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. पुण्यानंतर ठाण्यात 10 हजार 353 तर मुंबईत 7 हजार 927 आणि नागपूरमध्ये 5 हजार 063 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात कोरोना मृत्यूंचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. राज्यात आज 73 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आजपर्यंत 49 हजार 970 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.55 इतका झाला आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यू मुंबईमध्ये झाले आहेत. मुंबईत 11 हजार 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे जिल्ह्यात 7818 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात 5 हजार 621 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 32 लाख 67 हजार 917 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 19 लाख 61 हजार 975 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.79 टक्के आहे. सध्या राज्यात 2 लाख 42 हजार 585 होम क्वारंटाईन आहेत. तर 3 हजार 015 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.