कोल्हापूरातील राष्ट्रीयकृत बँकेची बनावट E-Mail द्वारे तब्बल 29 लाखांची फसवणूक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर येथील एका नामांकित ॲटोमोबाईल्स कंपनीचा सदस्य असल्याचे खोटे सांगून तिघा अज्ञात व्यक्तींनी बनावट ई-मेलद्वारे एका राष्ट्रीयीकृत बँकेतून तब्बल २९ लाख ३४ हजाराची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिंकू कुमार, नेसर आलम आणि अन्य एक या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध चंद्रकांत बसाप्पा गुडस्कर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या तिघा अज्ञातांनी २७ जानेवारीस सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्या नामांकित ॲटोमोबाईल कंपनीचा सदस्य असल्याचे खोटे सांगून बनावट ई-मेलवरून खात्यातून २९ लाख ३४ हजार रुपये एवढी रक्कम आपल्या खात्यावर जमा करण्यास भाग पाडत, एका राष्ट्रीयीकृत बँकेस भाग पाडून, फसवणूक केली आहे. तसेच त्यानुसार मिळालेल्या मोबाईल सीमकार्ड क्रमांकावरून पोलिसांनी लाभार्थी रिंकू कुमार, नेसर आलम व अन्य एकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच बँकेमध्ये जरूरी असलेली कागदपत्रे बनावटरित्या सादर करून व खरे असल्याचे भासवून पैसे हडप करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले आहे. असे सांगण्यात आले.

दरम्यान, फसवणुकीचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड करीत आहेत. याबाबत बँकेशी संपर्क साधला असता, या ॲटोमोबाईल्स कंपनीच्या नावे अज्ञातांनी बनावट कागदपत्रे सादर करून आरटीजीएसद्वारे पैसे घेऊन बँकेची फसवणूक केली आहे. असे पोलिसांकडून सांगण्यात आले.