धक्कादायक ! तरुणीच्या छातीतून काढली ३.५ सेंटीमीटरची पिन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चेंबूर येथील झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी एका १८ वर्षीय तरुणीच्या फुफ्फुसात ३ . ५ सेंटिमीटरची पिन आधुनिक ब्रॉन्कोस्कोपने यशस्वीपणे बाहेर काढली. २७ नोव्हेंबर रोजी या तरुणीला रूग्णालयात दाखल केल्याबरोबर त्याच दिवशीब्रॉन्कोस्कोपने  पिन बाहेर काढण्यात आली.

ही तरुणी २१ नव्हेंबर रोजी गोव्यात होती . त्यावेळी स्कार्फ परिधान करताना तोंडात धरलेली पिन  चुकून  तरुणीने गिळली  तेव्हा  लगेचच  तिला गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडे नेण्यात आलं. पिन नक्की कुठे अडकली आहे, ते शोधण्यासाठी एक्स-रे काढण्यात आला.त्यांच्या कडून  एण्डोस्कोपीनं पिन काढण्याचा प्रयत्नही केला गेला . पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही . त्यानंतर  तिला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं. पण, तेथेही पिन काढण्यात यश मिळाले नाही. व पुढील उपचार मुंबईत घेण्याचा निर्णय तिच्या कुटुंबियांनी घेतला आणि ते झेन हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. अरविंद काटे यांनी सांगितले  की, या तरुणीच्या फुफ्फुसात अडकलेली पिन धारदार आणि अणकुचीदार होती. ती काढली नसती, तर  तिच्या हृदय व फुफ्फुसातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचले असते. त्याचप्रमाणे ६ दिवसांपासून ती पिन तिच्या शरीरात असल्यामुळे तिला संसर्ग होण्याचा धोका होता. ओपन सर्जरी किंवा छेद देऊन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय अत्यंत गुंतागुंतीचा होता. कारण एण्डोस्कोपी करून पिन काढताना आतील अवयव फाटण्याचा धोका होता, तसेच फुफ्फुसाचा पापुद्रा फाटण्याची शक्यता असल्यामुळे ब्रॉन्कोस्कोपी करून धारदार पिन बाहेर काढणे कठीण होतं. या प्रकरणात फोरसेप्सचा वापर करून लवचिक ब्रॉन्कोस्कोपने ती बाहेर काढली. यासाठी अत्यंत कुशल तज्ज्ञाची आवश्यकता असते. या प्रक्रियेनंतर काढलेला एक्स-रे अहवाल सामान्य होता,
“आमच्या कुशल डॉक्तरांच्या टीममुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे अशी ही गुंता गुंतीची प्रकरणे हाताळता येतात कोणत्याही प्रकारचा विलंब टाळण्यासाठी  आमची कोड ब्ल्यू टीम नेहमी सज्ज असते. अश्या प्रकरणात विलंब केल्यास पेशण्टच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो कोणताही धोखा निर्माण होऊ नये या साठी लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा”, असे झेन हॉस्पिटलचे संचालक डॉ. रॉय पाटणकर म्हणाले.