चाकूचा धाक दाखवून साडेतीन लाख रुपये लंपास

लोणी काळभोर : (हनुमंत चिकणे) लोणी काळभोर (ता. हवेली ) येथील ऑनलाईन वस्तूंची विक्री करणाऱ्या (इन्स्टाकार्ट सर्व्हिस प्रा. ली.)  कंपनीतील कामगाराला चाकूचा धाक दाखवून साडेतीन लाख रुपये चोरून नेल्याची घटना रविवारी (ता.२१) संध्याकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी लक्ष्मण पोपट शेलार (वय-३६ रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलार हे ऑनलाईन वस्तूंची विक्री करणाऱ्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे कामगाराजवळ रोख रक्कम साडेतीन लाख रुपये जमा झाली होती. रोजच्या प्रमाणे शेलार यांनी रात्री दहाच्या सुमारास शटरचे अर्धे दार उघडे ठेऊन राहिलेले काम करत होते. उद्या बँकेत रक्कम जमा करण्याच्या उद्देशाने ती रक्कम कार्यालयातील एका टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवली होती. त्याच वेळेस अर्धवट उघड्या ठेवलेल्या शटरमधून तोंडाला रुमाल बांधून दोन अज्ञात व्यक्ती आत मध्ये आल्या. व त्यातील एकाने पकडून ठेवून पैशाची शोधाशोध सुरु केली. परंतु त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. व पैसे कोठे ठेवले याची विचारपूस  करू लागले. शेलार यांनी घाबरत पैसे टेबलमधील ड्राव्हरमध्ये आहेत हे सांगितले. त्यानंतर पैसे घेतले व जाताना त्यातील एकजण म्हणाला कि तुमचा हा बाजार बंद करा याचा परिणाम माझ्या हडपसर मधील कपड्याच्या दुकानावर होत आहे. असे म्हणून टेबल वरती ठेवलेले चार नवीन मोबाईलसह चार बॉक्स घेऊन पसार झाले. जाताना शटर बाहेरून बंद केले.

याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तरी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करीत आहेत.
जाहिरात