7 दिवसांच्या बाळाच्या लहानशा ह्रदयात 3 ब्लॉक, आदित्य ठाकरेंना कळताच…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : नवजात बाळाच्या प्रकृतीमुळे एक बाप प्रचंड अस्वस्थ होता. जन्मताच या बाळाच्या ह्रदयात 3 ब्लॉक आढळून आले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे बाळाचे कुटुंबीय हवालदील झाले होते. शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना या बाळाबद्दल माहिती मिळाली आणि तातडीने 1 लाखांची मदत पुरवली. या बाळाचा वैद्यकीय खर्च देखिल उचलण्याची घोषणा ठाकरे यांनी केली. घनसोली परिसरात राहणार्‍या अब्दुल अन्सारी नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. पण, दुसर्‍याच क्षणाला हे वातावरण चिंतेत बदलले होते. बाळाला ह्रदयाशी संबंधीत आजार असल्याचे निष्पन्न झाले.

बाळाच्या ह्रदयात 3 ब्लॉक आढळून आल्याने त्याचा जीव धोक्यात सापडला होता. बाळाला नेरुळ येथील मंगल प्रभु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बाळाला मदत करावी अशी याचना अन्सारी कुटुंबीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. अन्सारी कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत बेताची अशी होती. या बाळाच्या वडिलाने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ हा मन हेलावून टाकणार होता. ’मी 10 ते 12 हजार रुपये कमवणारा माणूस आहे, आठ दिवस झाले अजून बाळाची प्रकृती नाजूक आहे.

माझ्याकडे पैसे नाही, मी काही करू शकत नाही’, असं म्हणून अन्सारी यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती ही बाब स्थानिक शिवसैनिक हुसैन शाह यांच्या लक्षात आली. त्यानंतर बाळाच्या प्रकृतीबद्दलची माहिती शिवसेनेचे युवा नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आली. बाळाची माहिती मिळताच आदित्य ठाकरे यांनी तातडीने मदतीसाठी पाऊल उचलले. आदित्य यांनी अन्सारी कुटुंबाला तातडीने 1 लाखांची मदत पुरवली आणि बाळाच्या उपचाराचा पुढील खर्च ही उचलणार असल्याचे जाहीर केले.