वर्षभरात राज्यातील 3 कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वादः छगन भुजबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात 26 जानेवारी 2020 ते 20 जानेवारी 2021 या कालावधीत तब्बल 3 कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारचा महत्वकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन योजना सुरू केली.

राज्यात गेल्या वर्षी 26 जानेवारी या महत्त्वकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार केवळ 10 रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर कोरोना प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ 5 रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतला होता. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू केला होता. मात्र अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने पाच रुपयात शिवभोजन देण्याचा निर्णयास मार्च 2021 पर्य़ंत मुदतवाढ दिली आहे.

असंघटित कामगार,कष्टकरी, स्थलांतरित, विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर आदीच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिल पासून तालुकास्तरावर विस्तार केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात दिलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ केली आहे. तसेच शिवभोजनच्या वेळेतही वाढ केली आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी 30 रुपये शासन अनुदान देत आहे. तसेच राज्यात सुरू असलेल्या शिवभोजन थाळीचा उद्दिष्ठामध्ये वाढ करून अधिक अधिक जनतेपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.