सराईत गुन्हेगारांकडून ३ लाखांचे कोकेन जप्त, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-पुणे शहरामध्ये कोकेन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून ३ लाख रुपये किंमतीचे १५.६२० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आली. ही कारवाई आज (मंगळवार) दुपारी दोन वाजता ग्रॉफिकॉन आर्केड इमारतीमधील जब्बार ट्रॅव्हल्स समोरील बस स्टॉपसमोर करण्यात आली.

मोहन उर्फ रोहन मल्लाप्पा गौडगीरी (वय-२३ रा. मोजेसवाडी, वडगाव शेरी), गौरव उर्फ गोपाल हरिष इस्सार उर्फ शर्मा (वय-३५ रा. औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना या पूर्वी देखील अंमली पदार्थाची विक्री करताना अटक करण्यात आली होती.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी रोहन गौडगीरी हा ग्रॉफिकॉन आर्केड इमारतीमधील जब्बार ट्रॅव्हल्स समोरील पीएमटी बस स्टॉपसमोर संशयितरित्या आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतील असता त्याच्याजवळ ३ लाखांचे कोकेन मिळून आले.

गौडगीरीकडे केलेल्या सखोल चौकशीत हे कोकेन गौरव शर्मा याने विक्रीसाठी दिले असल्याची माहिती दिली. तसेच गौरव हा खासगी ट्रॅव्हल्सने म्हैसूर येथे जात असल्याची माहिती गौडगीरीने पोलिसांना दिली. अंमली विरोधी पथकाने कोल्हापूर पोलिसांना याची माहिती दिली. कोल्हापूर पोलिसांनी आरोपी ज्या बसमधून प्रवास करीत होता. ती बस अडवून आरोपीला ताब्यात घेऊन अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात दिले. आरोपींवर कोरेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून शर्मा हा पुणे शहर व औरंगाबाद शहर येथे अंमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तर गौडगीरी याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात कोकेन बाळगल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदीप देशपांडे, आर्थिक व सायबर गुन्हे पोलीस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे, पोलीस कर्मचारी अविनाश शिंदे, दिलीप जोशी, बाबा शिर्के, मोहन साळवी, अर्जुन दिवेकर, शिवाजी राहिगुडे, गणेश देशपांडे, प्रफुल साबळे, महेंद्र पवार, विशाल शिंदे, हेमा ढेंबे, सचिन चंदन, अमित छडीदार, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.