हंदवाडामध्ये दहशतवाद्यांकडून पून्हा हल्ला, 3 CRPF चे जवान शहीद

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे सोमवारी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला, ज्यात सीआरपीएफचे 3 जवान शहीद झाले. मात्र, सुरक्षा दलाने अचानक झालेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देऊन एका दहशतवाद्याचा खात्मा केला. केवळ दोन दिवसांपूर्वी शनिवारी हंदवाडामध्येच झालेल्या दहशतवादी चकमकीनंतर हा हल्ला झाला. यात दोन अधिकाऱ्यांसह 5 सैनिक शहिद झाल्यानंतर दहशतवाद्यांनी आज येथील क्रालगुंड परिसरातील वंगममध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्याला घेरून गोळीबार केला.

वंगम स्टॉपजवळ दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला, जेथे संयुक्त सुरक्षा दलाने नाकाबंदी केली होती. या हल्ल्यात काही सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते, ज्यातील तीन जणांना नंतर आपले प्राण गमवावे लागले.

तसेच मिळालेल्या माहितीनुसार, सफरचंदाच्या बागेत एक दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. जिथे हल्ला झाला होता. आता वरीष्ठ अधिकारी मृतदेहाची ओळख पटविण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते. सोबतच 6 नागरीकही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. काही नागरीकांना हंदवाडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात 7 इतर सुरक्षा कर्मचारीही जखमी झाल्याचे समजते. माहितीनुसार हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसरात घेराव घालण्यात आला होता.

याआधी सोमवारीच भारताचे सेना प्रमुख एमएम नरवणे यांनी म्हटले की, हंदवाडामध्ये दहशतवाद्यापासून नागरिकांना वाचविण्यादरम्यान आपला प्राण गमविणाऱ्या 5 जवानांवर देशाला गर्व आहे. त्यांनी आशुतोष शर्मा यांचे कौतुक करताना म्हटले की, ते समोरून गेले, जेणेकरून नागरिकांचे नूकसान होऊ नये. त्यांनी असे देखील म्हटले की, मी आपली सेना आणि जम्मू काश्मीरच्या शूर वीरांबद्दल आपली संवेदना आणि आभार व्यक्त करू इच्छितो.