WB Elections : पश्चिम बंगालमध्ये 15 ठिकाणी बॉम्बहल्ला, तिघे जखमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे बंगालमध्ये अनेक हिंसक घटना समोर येत आहेत. अशातच बंगालच्या नॉर्थ 24 परगना जिल्ह्यात तब्बल 15 ठिकाणी बॉम्बहल्ला झाला असून यात तिघे जखमी झाले आहेत. यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. यावेळी हल्लेखोरांनी ठिकठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीची तोडफोड केली आहे. या हल्ल्यामागे नेमक कोण आहे आणि यामागे काय हेतू आहे हे स्पष्ट झाले नाही. भाजपा खासदार अर्जून सिंग यांच्या घरापासून काही अंतरावरच हा हल्ला झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यांना त्यांना स्थानिकांच्या संतप्त आंदोलनाचा सामना करावा लागला. पोलिसांच्या उपस्थितीतच एक बॉम्ब फेकल्याचा आरोप केला आहे. हल्ल्यानंतर खासदार सिंग घटनास्थळी धाव घेत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. खासदार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 ते 12 दिवसांपासून येथील कायदा सुव्यवस्थेबाबत आम्ही पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. पण लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पावले उचलली गेली नाहीत. आम्ही निवडणूक आयोगालाही राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंबंधी सांगितले आहे. मात्र याच दरम्यान बॉम्बहल्ल्याची घटना घडली आहे. सत्ताधा-यांच्या सुचनेमुळे पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचे खासदार सिंग म्हणाले.