पहिल्या दिवशी 3 लाख लोकांना दिली जाईल ‘कोरोना’ची लस, देशभरात कशी आहे लसीकरणाची तयारी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना लसीची प्रतीक्षा केली जात आहे, सरकारने आपल्या स्तरावरही पूर्ण तयारी केली आहे, अधिकृत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कोरोना लसीसाठी देशव्यापी मोहिमेच्या पहिल्या दिवशी सुमारे 3 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाईल, 16 जानेवारीच्या रोजी देशभरातील 2,934 ठिकाणी लसीकरणाचे काम सुरू केले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका केंद्रात एका लसीकरण सत्रात सरासरी 100 लोकांनाच लस दिली जाईल, बुधवारी आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, “राज्यांना सल्ला देण्यात आला आहे की त्यांनी प्रत्येक लसीकरण सत्रामध्ये सरासरी 100 लोकांनाच लस द्यावी, प्रत्येक स्थळावर एका दिवसात अनुचित संख्येमध्ये लस न लावण्यासंदर्भात आणि गर्दी न करण्यासंदर्भात राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्राने राज्यांना अधिकाधिक लसीकरण स्थळे तयार करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरुन लसीकरणाची एक सरळ व सोपी प्रक्रिया चालू राहू शकेल. मंगळवारी सरकारने असे संकेत दिले की आरोग्य कर्मचार्‍यांना कोणत्या कंपनीची लस घ्यायची आहे याची निवड ते करतील, सध्या त्यांच्याकडे दोन लसींचा पर्याय आहे. पहिली म्हणजे कोविशील्ड लस ज्यास सीरम इन्स्टिट्यूट तयार करत आहे, तर दुसरा पर्याय म्हणजे कोवॅक्सिन ज्यास भारत बायोटेक कंपनी तयार करत आहे. यापूर्वी दोन्ही कंपन्यांच्या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली होती.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार लसीकरण प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक आहे जर आरोग्य कर्मचारी लस घेण्यास नकार देत असेल तर लसीकरण करण्याची सक्ती नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘बर्‍याच देशांमध्ये एकापेक्षा जास्त लस वापरल्या जात आहेत पण सध्या लसीचा डोस निवडण्याचा पर्याय देणारा असा कोणताही देश नाही.’

सरकारच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला सुमारे 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि 2 कोटी फ्रंटलाइन कामगारांना कोरोना लस दिली जाईल, त्यानंतर 50 वर्षांवरील लोक आणि त्यानंतर 50 वर्षांखालील ज्यांना या आजाराची लागण होण्याची शक्यता आहे किंवा साथीच्या आजाराची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि हेल्थवर्कर्सच्या लसीचा खर्च केंद्र सरकार वहन करणार आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत कोरोना लसीचे 1.65 कोटी डोस सरकारने खरेदी केले आहेत. ज्यापैकी 1.1 कोटी डोस कोविशील्डचे आहेत आणि 55 लाख डोस कोवॅक्सिनचे आहेत, त्यांना हळूहळू केंद्रशासित प्रदेश आणि राज्यात आरोग्य कर्मचार्‍यांच्या संख्येच्या प्रमाणात पोहोचवले जात आहे. कोविशील्ड लसीचे 1.1 कोटी डोस सीरम इन्स्टिट्यूटच्या पुणे स्थित लॅबमधून देशातील 60 प्रमुख ठिकाणी नेण्यात आले आहेत, तेथून त्यांना देशातील छोट्या-छोट्या ठिकाणी नेले जाईल. त्याच वेळी, भारत बायोटेकद्वारे देशातच विकसित करण्यात आलेल्या कोवॅक्सिनच्या 55 लाख डोसपैकी 2.4 लाख डोसची पहिली खेप 12 राज्यांमध्ये पाठविण्यात आली आहे.

एका अधिकृत सूत्राने सांगितले की कोवॅक्सिनला 12 स्थळांवर पाठविण्यात आले आहे, या 12 ठिकाणांची नावे असे आहेत- गणवराम, गुवाहाटी, पटना, दिल्ली, कुरुक्षेत्र, बेंगलुरू, पुणे, भुवनेश्वर, जयपूर, चेन्नई, लखनऊ आणि हैदराबाद. कोवॅक्सिन भारतीय बायोटेक कंपनीने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या सहकार्याने विकसित केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की कोविड-19 (COVID-19) च्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचा फरक असेल आणि त्याचा प्रभाव 14 दिवसांनंतरच दिसून येईल.