कोल्हापूर जिल्ह्यात एकाच दिवसात 3 नवीन ‘कोरोना’बाधित !

कोल्हापूर :  पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने जात असतानाच एकाच दिवशी आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आता कोल्हापूर जिल्हा रेड झोनमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या अहवालात तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १७ वर गेली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि चंदगड तालुक्यातील हे तीनही कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यात आजरा येथील एक महिला आणि एक पुरुष तर चंदगडच्या एका पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्यावर आजरा आणि चंदगड येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

आजरा, चंदगड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यामुळे या परिसराची कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. या तिघांना कोणाच्या संपर्कात आल्यामुळे लागण झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

कोल्हापूरातील आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १७ झाली आहे. त्यातील ९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकाचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे आता ९ जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.