नाशिकमध्ये रेमडेसिवीर ब्लॅकनं विकणार्‍या 3 नर्स अन् मेडीकलवाला ‘गोत्यात’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशासह राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे या आजारावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची साठेबाजी, काळाबाजार केला जात आहे. रुग्णांचे नातेवाईक या इंजेक्शनसाठी वणवण भटकत आहे. अशातच नाशिकमध्ये एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार जणांना अटक केली असून यामध्ये 3 नर्सचा समावेश आहे.

कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन जादा दराने विक्री करणाऱ्या चौघांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. आडगाव शिवारात क.का. वाघ कॉलेज परिसरात बनावट ग्राहक पाठवून आडगाव पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत मेडीकल दुकानात काम करणाऱ्या युवकासह तीन नर्स यांना पोलिसांनी अटक करुन दोन रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले. पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या या संयुक्त कारवाईत आरोपींकडून 54 हजार रुपये किंमतीचे 2 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहे.

दरम्यान, नाशिक शहरात यापूर्वीही रेमडेसिवीरचा काळाबाजार करताना अनेकांना अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे एक सामाजिक कार्यकर्त्याने सापळा रचून दोन जणांना पकडून दिले होते. त्यानंतर ही दुसरी करावाईची घटना घडल्याने नाशिक शहरात काळाबाजार करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहेत.