द्रुतगती महामार्गावर ट्रकचालकांना लूटणारे अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – द्रुतगती महामार्गावर पुनावळे येथे ट्रकचालकांना लूटून पळालेल्या चोरट्याना हिंजवडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

जावेद ईद्रीस शेख (19, रा. वाकड), सागर सुरेश जगताप (25, रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार महादेव किसन सुकळे (२६, रा. चिखली) हा फरार आहे. याप्रकरणी वसीम अक्रम रमजान (22, रा. नुहु, हरियाणा) याने फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर पुनावळे येथील गोकुळ हॉटेलसमोर सोमवारी (दि. 12) पहाटे सव्वादोनच्या सुमारास वसीम आणि त्यांचे दोन ट्रकचालक मित्र गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी जावेद, सागर आणि महादेव आले. त्यांनी जबरदस्तीने तीन ट्रक चालक मित्रांकडून जबरदस्तीने 3 हजार 40 रुपये चोरून नेले.

त्यानंतर, शनी मंदिर वाकड येथे हिंजवडी पोलिसांना काळ्या रंगाची नंबरप्लेट असलेली मोटारसायकल घेऊन दोघेजण वेगात जाताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता पोलिसांना पाहून दोघेजण पळून जाऊ लागले. पोलिसांनी शिताफीने अडवून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या आणखी एक साथीदार महादेव याच्यासोबत मिळून ट्रकचालकांना लुटल्याचा गुन्हा केल्याचे कबूल केले. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील चोरी आणि घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. सागर जगताप याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात तीन, चिंचवड पोलीस ठाण्यात दोन आणि सांगवी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

हि कामगिरी उपायुक्त विनायक ढाकणे, वरिष्ठ निरीक्षक गवारे, अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिरुध्द गिजे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –