क्रिकेट खेळण्यावरून कोल्हापूरात ‘राडा’, ‘तुफानी’ दगडफेक ; पोलीस निरीक्षक, ३ पोलिसांसह ९ जखमी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर : लहान मुलांच्या क्रिकेट सामन्यांतील वादातून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत पोलीस निरीक्षकासह ३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. येथील महाराणा प्रताप परिसरात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, महाराणा प्रताप चौकाच्या परिसरात सकाळी रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांमध्ये वादावादी झाली होती. हा वाद नंतर सामोपचाराने मिटविण्यात आला होता. त्यानंतर सकाळी झालेल्या वादावादीतून रात्री पुन्हा दोन गटात वाद सुरु झाला. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. परिसरात लावण्यात आलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संतप्त झालेल्या दोन्ही गटातील लोकांनी पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यात पोलीस निरीक्षकासह ३ पोलीस जखमी झाले. नागरिकांनी केलेल्या दगडफेकीत एकूण ९ जण जखमी झाले आहेत.

पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्यानंतर आणखी कुमक मागाविण्यात आली. त्यानंतर दंगल माजविणाऱ्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. यावेळी अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.