क्लिष्ट आणि गंभीर गुन्हयांचा पर्दाफाश केल्यामुळं 3 पोलिस निरीक्षकांचा ‘सन्मान’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा चांगला तपास केल्याबाबत गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आणि तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांचा पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 28) ‘क्राइम मिटींग’मध्ये प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघवी ज्वेलर्स नावाचे दुकान चोरट्याने 30 सप्टेंबर 2019 रोजी शटर उचकटून फोडले. या गुन्ह्याची उकल तळेगाव पोलिसांनी अवघ्या 48 तासाच्या आत करीत आसाम येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एका आरोपीला बेड्या ठोकल्या.

गुन्ह्यात चोरीला गेलेला 22 लाख 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. या तपासाकरिता पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांचा प्रशिस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. या तपास पथकामध्ये सहाय्यक निरीक्षक दुर्गानाथ साळी, उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बाजगिरे, हवालदार बंडू मारणे, सिताराम पुणेकर, पोलीस नाईक मनोज गुरव, अमोल गोरे महेंद्र रावते यांचा समावेश होता. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 27 सप्टेंबर 2019 रोजी किस्मतकुमार ऊर्फ संजयकुमार रवीलाल ऊर्फ अनिरूद्ध शर्मा यांचा खून करण्यात आला.

याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाचच्या पथकाने अवघ्या 24 तासात गुन्ह्याची उकल केली. यामुळे फिर्यादी याने इतर आरोपीच्या सहाय्याने खून केल्याचे उघडकीस आणले. हा गुणात्मक तपास केल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांचा पोलीस आयुक्‍तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपास पथकामध्ये पोलीस हवालदार धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, पोलीस नाईक दत्तात्रय बनसुडे, फारूक मुल्ला, संदीप ठाकरे आणि पोलीस शिपाई मयुर वाडकर आदी सहभागी झाले होते.

सप्टेंबर 2019 मध्ये गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने राजस्थानमधील एका वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून एक कोटी 13 लाख रुपये किंमतीच्या फॉर्च्युनर आणि इनोव्हा मोटारी हस्तगत केल्या. यामुळे 12 गुन्हे उघडकीस आले आहे. सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांचा पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या तपासामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र राठोड, हवालदार प्रमोद लांडे, पोलीस नाईक अमित गायकवाड, अंजनराव सोंडगिर, मनोजकुमार कमले, महेंद्र तातळे, पोलीस शिपाई विजय मोरे विशाल भोईर यांचा सहभाग होता.

Visit : Policenama.com