पोलिस अधीक्षकांनी केलं जिल्ह्याच्या सीमेवर स्टिंग ऑपरेशन ! ‘चिरीमिरी’ घेणार 3 पोलिस निलंबीत, तिघांना दंड तर 5 जणांना 25 हजाराचं बक्षीस

बीड : पोलीसनामा ऑनलाइन (अमजद खान, बीड) – जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी लॉकडाऊनची संपुर्ण जिल्हयात कडक अंमलबजावणी कली आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील 4 चेक पोस्टवर त्यांनी डमी लोक पाठवून स्टिंग ऑपरेशन केलं. त्यामध्ये चिरीमिरी घेऊन जिल्हयात प्रवेश देणार्‍या तिघांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आलं तर तिघांना दंड ठोठावण्यात आला. उत्तम कामगिरी करणार्‍या 5 पोलिस कर्मचार्‍यांना 25 हजारांचे बक्षीस देखील त्यांनी जाहीर केलं आहे. स्वतः पोलिस अधीक्षकांनी स्टिंग ऑपरेशन केल्यामुळं बीड जिल्हा पोलिस दलामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

कुठे काय झाले ?

1. खामगाव चेक पोस्ट :
वाहनाला जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पैशांची मागणी केली गेली. चेक पोस्टवर कार्यरत एस. बी. उगले, एम.के. बहिरवाळ, डी.बी गुरसाळे हे कर्मचारी निलंबित केले गेले.

2. महारटाकळी चेक पोस्ट :
वाहन आले गेले पण अडवलेही नाही चौकशीही नाही कर्तव्यात कसूर म्हणून बी.बी. लोहबंदे, एस.के.लखेवाड, एस.एस. वाघमारे यांना प्रत्येकी 03 हजारांचा दंड

3. मातोरी चेक पोस्ट :
कुठल्याही अमिषाला बळी न पडता जिल्ह्यात प्रवेश दिला नाही. डी.एम.राऊत, डी.एम.डोंगरे, टी. यू. पवळ यांना प्रत्येकी 05 हजारांचे बक्षिस

4 दौलावडगाव चेक पोस्ट
जिल्ह्यात प्रवेश न देता उत्कृष्ट काम एस.ए. येवले, व्ही.एस.माळी यांना प्रत्येकी ०५ हजारांचे बक्षीस