Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहायला सगळ्यांनाच आवडतं. सातत्याने सोशल मीडियावर काहीतरी भन्नाट ऐकायला, वाचायला आणि अनुभवायला मिळत असतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न जुळलेली अनेक उदाहरणे आपण ऐकली असाल. याच फेसबुकच्या माध्यमातून तिघी सख्ख्या बहिणींचे सूत तीन मित्रांसोबत जुळलं आणि यातूनच एकाच दिवशी या तिघी पळून गेल्याची घटना नुकतीच बिहारमध्ये उघडकीस आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून जुळलेलं हे सूत अखेर घरच्यांना समजलं आणि त्यांनी याच सुतावरून स्वर्ग गाठून या तिघींना घरी परत आणलं आहे.

या बाबतची सविस्तर घटना अशी की, बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील एका गावात या तिन्ही बहिणी आपलया आईवडिलांसोबत राहतात. हातात मोबाईल असल्याने या तिघी बहिणी नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असायच्या. यातूनच या तिघींची तीन अनोळखी तरुणांशी ओळख झाली. हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. नेहमी फेसबुकच्या आभासी माध्यमातून संपर्कात असणाऱ्या या तिघा जोडप्यांनी लग्न करणायचा निर्णय घेतला. तिघी बहिणींनी एकत्रित विचार करून एकाच दिवशी म्हणजे व्हॅलेंटाईनच्या दिवशी घरातून पळ काढला. जेव्हा कुटुंबियांच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

यातील दोन मुली या अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या प्रियकरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या तिन्ही मुली घरी परतल्यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्पर तपास यंत्रणा राबवून या तिन्ही मुलींचा आणि त्यांच्या प्रियकरांचा शोध घेतला. त्यावेळी या तिन्ही मुली पाटण्यात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी लगेच या जोडप्यांना ताब्यात घेतले.