फिल्मी स्टाईलने जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – फिल्मी स्टाईलने दुचाकीवरून येऊन पादचारी नागरिकांना धक्का देऊन त्यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने चोरून नेणा-या तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. किशोर नारायण ढवळे (२८), विजय ऊर्फ बन्या दत्तात्रय सरोदे (२१) आणि विजय मसू कांबळे (२८, तिघे रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात जबरी चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार किशोर याला हिंजवडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे डिबी पथकाच्या पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी किशोर याने त्याचे साथीदार सरोदे आणि कांबळे यांच्यासोबत मिळून हद्दीत जबरी चोरी केल्याचे समोर आले. त्यानुसार त्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या तिघाकडे चौकशी करुन एक मोबाईल फोन आणि एक हजार ७०० रुपये रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आला. यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याचा तपास सुरु आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, तपासी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिरुध्द गिजे, गवारी यांच्या पथकाने केली आहे.