लासलगावला 3 रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द

लासलगाव – कोरोना च्या पार्श्वभूमीवर लासलगाव रेल्वेस्थानकावरील तीन रेल्वेगाड्यांचे थांबे रद्द करण्यात आला आहे.२ डिसेंबर पासून नांदेड -मुंबई देवगिरी एक्सप्रेस, पटना लोकमान्य तिलक जनता एक्सप्रेस आणि कामायनी या गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आल्याने लासलगाव व परिसरातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आशिया खंडातील कांद्यासाठी सुप्रसिद्ध असलेले लासलगाव या शहरांमध्ये नेहमीच वर्दळ असते मोठ्या प्रमाणात बाहेर राज्यातील व्यापारी हे लासलगाव मध्ये व्यापारानिमित्त येत असतात. कोरोनाच्या आधी लासलगाव रेल्वे स्थानकातून समाधानकारक उत्पन्न मिळत असतानादेखील तीन एक्सप्रेसचा थांबा रद्द केल्याने प्रवाशांचे मोठे हाल होणार आहे. लासलगाव वरून नाशिक मुंबईकडे तर लासलगाव मनमाड ,जळगाव, भुसावळ कडे जाण्यासाठी आता कोणतीही गाडी नसल्याने रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी लासलगावकरांन कडून केली जात आहे.

लासलगाव प्रवासी संघटनेतर्फे या तीनही गाड्यांचे थांबे रद्द करण्यात यावे यासंदर्भात वरिष्ठांची पत्रव्यवहार केला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजु जाधव यांनी दिली आहे.