Advt.

Kankavali News : घरासमोर उभ्या 3 दुचाकी जाळल्या, आगीचे कारण गुलदस्त्यात

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – घरासमोर उभ्या असलेल्या 3 दुचाकींना आग लावल्याची घटना बुधवारी (दि. 9) पहाटेच्या सुमारास कणकवली नागवे रोड येथे घडली. यात 2 दुचाकी जळून खाक झाल्या असून, एका दुचाकीला आगीतून वाचविण्यात यश आले आहे. मात्र, ती दुचाकी किरकोळ जळाली आहे. आग लागली की लावली गेली, याबाबत सध्या उलटसुलट चर्चा होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पहाटेच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

आगीत पांडुरंग पवार यांची डिस्कवर, मोहिते प्लेझर, पाताडे यांची पॅशन प्रो, अशा प्रकारच्या दुचाकीचा समावेश आहे. आग लागली की कोणीतरी लावली याबाबत उलटसूलट चर्चा सुरू आहे. कारण गाड्या उभ्या असलेल्या घरा समोरील निमनकर यांच्या घराला बाहेरून कडी घालण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे गाड्यांना आग लावतेवेळी कोणी बाहेर येऊन आपला प्लॅन फसू नये, या उद्देशाने कडी लावली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी कणकवलीत गाड्यांना आग लावण्याचे प्रकार अनेकदा घडलेले असल्याने हा प्रकार नेमका कशातून झाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.