रेल्वेच्या धडकेत ३ कामगार ठार

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – रायगड जिल्ह्यातील पेण जवळील जिते रेल्वेस्थानक येथे तेजस एक्स्प्रेसने तीन कामगारांना उडवले. या भीषण दुर्घटनेत रेल्वेचे तीन कामगार ठार झाले. रविवारी रात्री हा अपघात झाला. या कामगारांचे मृतदेह पेणच्या शासकीय रुग्णालयात आणले असून शवविच्छेदनानंतर ते मृतांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार आहेत.

अशोक बारे (३०), मानसिंग गुलकर (४०) आणि अजय दांडोदिया (१८) अशी मृतांची नावे आहेत. पेण आणि पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान असणाऱ्या जिते रेल्वे स्थानकाशेजारी तिघेही रविवारी रात्री रेल्वे रुळ ओलांडत असताना तेजस एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. तिघेही रेल्वेचे कंत्राटी कामगार होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.