प्रेमविवाहाच्या रागातून जावयावर ॲसिड हल्ला

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमविवाहाच्या रागातून जावयावर ॲसिड हल्ला केल्याप्रकरणी रेठरे, ता. कराड येथील सासू सासऱ्यासह दोन मेहुण्यांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रूपये दंडाची शिक्षा कराड येथील प्रथमवर्ग न्या. रवींद्र गवई यांनी ठोठावली. दंडाच्या रक्कमेतील २५ हजार रूपये जावयास नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. बाळासाहेब नारायण खिलारे, विजया बाळासाहेब खिलारे, तुषार बाळासाहेब खिलारे, सतीश बाळासाहेब खिलारे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

रेठरे, ता. कराड येथील बाळासाहेब खिलारे यांच्या मुलीने संजय लक्ष्मण सावंत याच्याशी प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाहामुळे खिलारे आणि संजय सावंत यांच्या कुटूंबात तणावाचे वातावरण होते. यातून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. दि. २३ सप्टेंबर २००४ रोजी रेठरे गावची यात्रा होती.

संजय सावंत हा नातेवाईकाच्या घरासमोर बसला होता. त्यावेळी संशयित बाळासाहेब खिलारे याने संजयला ‘तू इथे का आलास, तुला गावात येऊ नको, म्हणून सांगितले होते असे म्हणून दमदाटी केली. तुला बघतोच, असे म्हणत बाळासाहेब खिलारे याने ग्लासमधून ॲसिड आणून सावंत याच्या तोंड, हात, छातीवर फेकले. तर सासू विजया खिलारे हिने त्याच्या डोक्यात फळी मारल्याने संजय गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू होते.