तीन वर्षांच्या चिमुरडीने गिळलं ५ रूपयांचं नाणं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- लहान मुलांकडून नाणे गिळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता मुंबईतील दहिसर परिसरात राहणाऱ्या मुलीने पाच रुपयांचं नाणं गिळले. नंदीता मोरे असे या मुलीचे नाव असून ती तीन वर्षांची आहे. घरात खेळत असताना जमिनीवर पडलेलं पाच रुपयांचं नाणं तिने खेळताना गिळलं. नाणं गिळल्याने या मुलीला बोलायला आणि श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. कुटुंबियांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी बोरीवलीच्या अपेक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

त्यानंतर, रूग्णालयात नंदीताच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचणी अहवालात मुलीच्या घशात पाच रुपयांचं नाणं अडकल्याचं निदान झालं. श्वास घेण्यात अडचण जाणवत असल्याने तातडीने उपचार करणं गरजेचं होतं. या स्थितीत पालकांची परवानगी घेत डॉक्टरांनी तोंडातून दुर्बिणीद्वारे हे नाणं बाहेर काढलंय. अपेक्स सुपर स्पेशालिटी मधील गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. राजीव हिंगोरानी आणि त्यांच्या टीमने ही शाश्त्रक्रिया केली.

यासंदर्भात माहिती देताना अपेक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. राजीव हिंगोरानी यांनी सांगितलं की, “घरी खेळतांना या मुलीने पाच रुपयांचं नाणं गिळलं होतं. ही मुलगी रुग्णालयात आली तेव्हा तिची प्रकृती नाजूक होती. तिला श्वास घ्यायला अडचण जाणवत होती. अन्ननलिका आणि श्वसननलिकेच्या मध्ये हे नाणं अडकलं होत. तातडीने उपचार करणं गरजेचं असल्याने दुर्बिणीच्या सहाय्याने हे नाणं बाहेर काढलं. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच तिला डिस्चार्ज दिला जाईल.”

“ही प्रकरण नवीन नाहीत. पण, काही प्रकरणांत मुलांनी गिळलेल्या वस्तू आपोआप बाहेर येतील याची पालक वाट बघतात. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. मुलं ६ वर्षाची होईपर्यंत पालकांनी विशेष काळजी घेणं महत्वाचं आहे. ग्रामीण भागात अनेकवेळा रुग्णालय लांब असल्यामुळे अशा घटनांमध्ये मुलांचा जीव जातो. पण, शहरी भागांमध्ये सुद्धा अशा घटना वाढत असून वेळ न घालवता रुग्णालयात वेळीच पोहचणं महत्वाचं आहे.” असंही डॉ. हिंगोरानी यांनी सांगितलं.