Video : PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि 17 सप्टेंबर) आपला 70 वा वाढदिवस साजरा केला. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपकडूनही वाढदिवसाची जोरदार तयारी करण्यात आली होती. यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली. मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाला आहे. यात भाजपचे तब्बल 30 कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यात भाजपचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये भाजपच्या वतीनं नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात येत होता. अंबात्तूर परिसरात होत असलेल्या या कार्यक्रमात जवळपास 2 हजार हेलियम गॅसचे फुगे आकाशात सोडण्यात येणार होते.

फुगे आकाशात सोडण्याची जोरदार तयारी सुरू होती मात्र त्याच दरम्यान अचानक फुग्यांचा स्फोट झाला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भाजपचे 30 कार्यकर्ते यात जखमी झाले.