काय सांगता ! होय, तब्बल 30 लाख फोन कॉल्स, भारतीय लष्कराच्या माहितीसाठी चायनीच कंपन्यांची मदत, मोठा खुलासा

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईत हेरगिरी प्रकरणात क्राइम ब्रांचने मोठा खुलासा केला असून जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्काराची माहिती मिळवण्यासाठी चीनच्या 3 कंपन्या फोन कॉलसाठी मदत करत असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. मुंबईतून 3 चिनी कंपन्या या भारतीय लष्कराची गुप्त माहिती मिळवण्यासाठी मदत करत होती.

या कंपन्याची लोक भारतात वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसलेली आहे, त्यांचा पोलीस शोध घेत आहे. या कंपन्यांकडून फोन कॉल्ससाठी एक मार्ग तयार करून देण्यात आला होता. त्यातून पाकिस्तान, चीन आणि नेपाळमध्ये भारतीय लष्कराची गुप्त माहिती पुरवली जात होती. गेल्या आठ महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या हालचालींवर ही लोकं नजर ठेवून होती.

जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कर काय पाऊलं उचलत आहे. याची संपूर्ण माहितीही फोन कॉलच्या माध्यमातून पुरवली जात असल्याचे उघड झाले आहे. आठ महिन्याच्या काळात जवळपास 30 लाखांहुन जास्त प्रमाणात फोन कॉल्स करण्यात आले होते. यात 2 लाख मिनिटांपर्यंत बोलणे झाले आहे, अशी माहिती हाती लागली आहे. या प्रकरणामागे दहशतवाद्यांचा तर हात नाही ना, त्या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहे.