तीन डंपरसह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

पाथर्डी तालुक्‍यात वाळू तस्करांवर कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी तालुक्यातील अवैध वाळू तस्करी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या व पाथर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. फुंदेटाकळी शिवारातून शासनाचा कर चुकवून चोरीची वाळू वाहतूक करणारे तीन डंपर व वाळू असा ३० लाख ४८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तीन डंपर चालकांना यावेळी अटक करण्यात आली.

फुंदेटाकळी शिवारात मुंगी येथून वाळू भरून तीन डंपर पाथर्डीकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पो. हे. कॉ. बाळासाहेब भोपळे, पो. कॉ. सागर सुलाने, पो. कॉ. जालिंदर माने, तसेच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पो. हे. कॉ. रेवणनाथ रांझणे, पो. कॉ. राहुल खेडकर, पो. कॉ. बडधे यांच्या पथकाने सापळा लावून तीन डंपर पकडले. त्यात प्रत्येकी ४ ब्रास वाळू असल्याचे आढळून आले.

त्यामुळे डंपर (क्र. एम. एच. १६ ए. वाय ५४५ ) चालक दत्तात्रय ऊत्तम गरड रा. मुंगी, ता. शेवगाव व मालक सुधीर संभाजी शिरसाठ रा. शिरसाठवाडी, दुसरा डंपर (क्र. एम. एच. ०५ सी. जी. ४२००) चालक योगेश भिवाजी पांडव रा. मुंगी, मालक संदिप कचरू पालवे रा. भेडा खुर्द, ता. नेवासा तसेच तिसरा डंपर (क्र. एम. एच. १७ बी. डी. ७६७६) वरील चालक शाहरूख रज्जाक शेख रा. मुंगी, मालक संदीप कचरू पालवे यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. तरीही ते वाळू चोरी करत होते.

पो. कॉ. विनोद मासाळकर यांनी याबाबत फिर्याद दिली. तीन डंपर वाळूसह एकूण ३० लाख ४८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तीनही डंपर चालकांना अटक करण्यात आली आहे.