सोलापूर : 30 अधिकारी अन् 296 पोलिसांची कोरोनावर मात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलात आतापर्यंत 30 अधिकारी अन् 296 अंमलदारांनी जीवघेण्या कोरोना आजारावर मात केली आहे. दरम्यान, 1 अधिकारी 4 कर्मचा-यांना मात्र कोरोनावर मात करण्यात अपयश आले आहे. सध्या 1 अधिकारी आणि 7 कर्मचा-यावर उपचार सुरु असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

गेल्या वर्षभरापासून नागरिक कोरोनापासून दूर आणि सुरक्षित राहावेत म्हणून पोलिसांना रस्त्यावर उतरून बंदोबस्त करावा लागत आहे. बंदोबस्त, नाकाबंदी, क्वारंटाइन सेंटर, प्रतिबंधित क्षेत्र, गस्त आदी ठिकाणी अहोरात्र काम करताना 33 पोलीस अधिकारी व 307 अंमलदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र वेळेवर उपचार, वरिष्ठांकडून नियमित तब्येतीविषयी विचारण आदीमुळे 30 अधिकारी व 296 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होताच सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पोलिसांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी प्रत्येक ठाण्यात सॅनिटायझर तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढीच्या गोळ्या देऊन खबरदारीसाठी चांगले प्रयत्न केले होते. खबरदारी घेऊनही कित्येक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून आजही ती सुरुच आहे.