Coronavirus : कल्याणमधील रिलायन्सचं स्टोअर्स ‘सील’, 30 कर्मचारी ‘क्वारंटाईन’

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – येथील वायले नगरच्या रिलायन्स स्मार्ट स्टोअर्स मधील किराणा दुकानात असलेल्या एका कामगाराला कोरोना संसर्गाची लागण झाल्याच स्पष्ट झाल आहे . त्यानंतर या स्टोअर्समधील ३० कामगारांना क्वारंटाईन करण्यात आलं. तसेच स्टोअर्स सील करून गेल्या २० दिवसांत या स्टोअर्समध्ये आलेल्या ग्राहकांचा शोध घेण्यात येत आहे.

कल्याण मधील वायले नगर भागात असणाऱ्या रिलायन्स स्मार्ट स्टोअर्स मधील एका ३९ वर्षीय व्यक्तीला कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे आढळले. त्यानंतर कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ हे स्टोअर्स सील करून स्टोअर्स मधील ३० कामगारांना क्वारंटाईन केलं. तसेच स्टोअर्समध्ये १ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान आलेल्या सर्व ग्राहकांना स्वतःहून होम क्वारंटाईन होण्याचं आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आलं. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, आम्ही या दुकानात १ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत आलेल्या ग्राहकांची माहिती सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यामध्ये आम्हाला यश नाही मिळालं तर या कालावधीत जे ग्राहक स्टोअर्स मध्ये आले होते व ज्यांनी स्टोअर्स मधून खरेदी केली होती, अशा ग्राहकांना बिल पाहून शोध घेण्यात येणार आहे.

हा कोरोना संसर्गित व्यक्ती कल्याण पूर्वेला राहतो. तो ज्या इमारतीत राहतो, ती इमारत सुद्धा सील करण्यात आली आहे. तसेच त्याच्या कुटुंबियांना आणि इमारतीतील लोकांना ३ मे पर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आलं. त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सर्वांचे स्वॅब घेण्यात आल्याचं पालिकेने सांगितलं आहे. ही व्यक्ती स्टोअर्समध्ये केवळ दोन ते तीन तासच काम करत होती. तरी त्याच्यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नसल्याचंपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी सांगितलं.