३०० काश्मिरी पंडित जाणार काश्मीरातील खीर भवानी आईच्या दर्शनाला ; ३ दशकांनंतर करणार पूजा

श्रीनगर : वृत्तसंस्था – १९९० च्या दशकात दहशतवाद्यांच्या नरसंहारानंतर काश्मीर सोडण्याची वेळ आलेल्या काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा काश्मीरचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी श्रीनगरजवळील खीर भवानी आईच्या पूजेसाठी काश्मीरी पंडितांना आमंत्रण दिले आहे.

दिल्लीतील जम्मू काश्मीर भवनापासून ही यात्रा १० जून पासून सुरुवात होणार आहे. आई खीर भवानीच्या दर्शनासाठी ही यात्रा रवाना होईल. या यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. खीर भवानी आईच्या दर्शनानंतर हरी पर्वत, शंकराचार्य मंदिर असा प्रवास करीत हे यात्रेकरु पुन्हा १३ जूनला दिल्लीत परत येणार आहेत.

सात लाख लोकसंख्या असलेले काश्मिरी पंडित यांना १९९० च्या दशकात दहशतवादामुळे काश्मीर सोडून परागंदा व्हावे लागले होते. राज्यपाल मलिक यांनी दिलेल्या आमंत्रणाकडे काश्मिरी पंडितांच्या घरवापसीच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

९० च्या दशकात परागंदा झालेल्या काश्मिरी पंडिताच्या पुढच्या पिढीने अजून काश्मीर कधी पाहिलेला नाही. त्यामुळे या तरुण पिढीला काश्मीर विषयी उत्सुकता आहे.

खीर भवानी आईचे मंदिर सोनमर्ग श्रीनगर महामार्गावर आहे. या भागात दहशतवाद्यांचा बोलबाला आहे. श्रीनगर शहराबाहेर काही अंतरावर खीर भवानी आईचे जुने मंदिर आहे. या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावर पर्यटक जात असतील तर लहान मुलांमार्फत गो बॅक इंडिया, गो बॅक इंडिया अशा घोषणा दिल्या जातात. त्यामुळे या परिसरात पर्यटकांच्या गाड्यांना नेहमीच निमलष्करी दलामार्फत सरंक्षण पुरविले जात असते. त्यामुळे काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा असणार आहे.