महाराष्ट्रात 300 मल्टिब्रँड मोबाईल रिपेअरिंग स्टुडिओ सुरु होणार

डिक्की व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्समध्ये सामंजस्य करार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज (डिक्की) व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रा. लि. च्या वतीने मोबाईल रिपेअरिंग करणारे मल्टिब्रँड मोबाईल रिपेअरिंग स्टुडिओ सुरु करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात याचे 300 स्पोक सेंटर्स उभारण्यात येणार असून ते तालुका पातळीवर सुरु करण्यात येणार आहेत. एससी व एसटी प्रवर्गाबरोबरच महिला व इतर प्रवर्गातील नवीन उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्या स्किल्ड, कौशल्यधारित, अनुभवी व परिश्रम करु इच्छिणाऱ्यांची निवड चाचणीद्वारे यासाठी निवड केली जाणार आहे, अशी माहिती डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रा. लि. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एससी व एसटी प्रवर्गातील होतकरू तरुण-तरुणींना नवउद्योजक बनविण्याच्या दृष्टीकोनातून डिक्की यासाठी मदत करणार असून त्याला केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया मध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहे. तसेच, या योजनेस महाराष्ट्र सरकारकडून 15 टक्के सबसिडी मिळणार आहे. डिक्की व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रा. लि. च्या दरम्यान यासंदर्भात मंगळवारी सामंजस्य करार झाला. याप्रसंगी डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, टेलिकॉम सेक्टर स्किलचे विभागीय व्यवस्थापक प्रदीप जसवाणी व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रा. लि. चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी उपस्थित होते.

तालुका पातळीवर लघु उद्योजक तयार करणे आणि गाव पातळीवर रोजगार उपलब्ध करून बेरोजगारीचा प्रश्न सोडविणे हा या प्रकल्पाचा मूळ हेतू आहे. आताच्या काळात ग्रामीण भागातही मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मोबाईल दुरुस्तीबरोबरच मोबाईल संदर्भात इतरही काम कुशलतेने होण्याची गरज भासते. हीच गरज ओळखून आणि त्यातील रोजगार निर्मितीची ताकद लक्षात घेऊन मल्टिब्रँड मोबाईल रिपेअरिंग स्टुडिओ महाराष्ट्रात सुरु करण्यात येत आहेत. डिक्की व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रा. लि. एकत्र येऊन हा प्रकल्प राबवित आहेत. यासाठी लागणारे नवउद्योजक शोधण्याचे काम डिक्की करणार आहे, असेही मिलिंद कांबळे व संजय गांधी यांनी सांगितले.

या प्रकल्पांतर्गत सर्व स्पोक सेंटर ही प्लग अॅण्ड प्ले स्वरुपाची असणार आहेत. सर्व स्पोक सेंटर फ्रॅंचाईजी म्हणून काम करतील. सर्व स्पोक सेंटर एकसारखी असतील आणि टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिलकडून प्रमाणित करण्यात येतील. स्पोक सेंटरमध्ये ग्राहक गॅलरी व मुलभूत मोबाईल रिपेअरिंगच्या सुविधा असतील. सर्व मोबाईल कंपन्यांच्या मोबाईलची याठिकाणी दुरुस्ती होईल. महाराष्ट्रात तालुका पातळीवर असणाऱ्या स्पोक सेंटरमध्ये मोबाईलमधील जटील समस्या ज्या दुरुस्त होणार नाहीत त्यासाठी विभागीय पातळीवरील हब सेंटरची मदत मिळणार आहे. हे हब सेंटर पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी असणार आहेत. या हब सेंटरमध्ये अद्ययावत उच्च दर्जाची यंत्रणा व कुशल प्रशिक्षित कर्मचारी असणार आहेत. ग्राहकांच्या सर्व शंकांचे निरसन करून त्यांना उच्च दर्जाची सुविधा पुरविणे हा मुख्य उद्देश या हब सेंटरचा असणार आहे, असेही संजय गांधी म्हणाले.

स्पोक सेंटरसाठी नवउद्योजक निवडण्यासाठी चाचणी होणार आहे. त्यामध्ये त्याचे मोबाईल क्षेत्रातील ज्ञान तपासले जाणार आहे. आवश्यक ते प्रशिक्षण देऊन हा व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारा परवाना, त्यासाठीची कागदपत्रे, साधनसामुग्री, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे, असेही संजय गांधी यांनी यावेळी सांगितले.

डिक्की व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रा. लि. बद्दल…

डिक्की ही संस्था दलित समाजातील नवउद्योजक घडविण्यासाठी काम करीत असलेली सामाजिक संस्था आहे. पद्मश्री मिलिंद कांबळे हे त्याचे संस्थापक अध्यक्ष असून देशभर या संस्थेचे कार्य सुरु आहे.

अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल इं. प्रा. लि. ही एक कौशल्य प्रशिक्षणातील अग्रगण्य संस्था असून ती राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ प्रमाणित आहे. तसेच, सदर संस्था ही इलेक्ट्रॉनिक सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया (ESSCI) टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल (TSSC), कॅपिटल गुड सेक्टर स्किल कौन्सिल (CGSC), रिटेल असोसिएशन सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया (RASCI), फुड इंडस्ट्रीज कॅपॅसिटीव्ह अॅण्ड स्किल इनिशिएटीव्ह (FICSI), ब्युटी अॅण्ड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल (BWSSC) या सहा कौन्सिल्सकडून प्रमाणित आहे. मागील 22 वर्षे ही संस्था कौशल्य प्रशिक्षणात कार्य करीत असताना भारतातील तीन राज्यात आपली 140 प्रशिक्षण केंद्रे सुरु करून आजपर्यंत चाळीस हजार प्रशिक्षणार्थी कौशल्य क्षेत्रात प्रशिक्षित व परिपूर्ण केले आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क :

दीपक दराडे (परफेक्ट मीडिया) – 9860054979

Visit : policenama.com