पाकिस्तानकडून सीमेवर ३०० रणगाडे तैनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याला दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र शांततेचे ढोंग करणाऱ्या पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. पाकिस्तानने भारत आणि पाकिस्तानच्या सीमेचा महत्वाचा भाग असलेल्या शकरगडमध्ये तब्बल ३०० रणगाडे तैनात केलेले आहेत.

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे भारतीय सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० जवान शाहिद झाले होते. यामुळे भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानने सीमेवर विशेष सैन्य तैनात केले होते. यामध्ये बख्तरबंद ब्रिगेड, १२५ बख्तरबंद ब्रिगेड आणि ८-१५ डिव्हिजन तैनात केलेल्या आहेत.

टाइम्स नाऊने दिलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या सीमेवरील सैन्याला एक स्वतंत्र बख्तरबंद ब्रिगेड साथ देत आहे. हे सैन्य खास आक्रमक हल्ल्यासाठी तयार करण्यात आलेले असते. पुलवामा हल्ल्यानंतर हे सैन्य इथे तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे .

दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने आक्रमक दल १ आणि दोन या पथकांना माघारी बोलावले नव्हते. यामुळे शकरगडमध्येही तैनात केलेले रणगाडे चिंतेचा विषय बनले आहेत. भारत आता यावर काय भूमिका घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.