उपासमारीमुळे तब्बल ३०० ‘याक’चा मृत्यू

गंगटोक : वृत्तसंस्था – सततच्या जोरदार हिमवृष्टीमुळे उत्तर सिक्कीममध्ये उपासमारीमुळे ३०० याकचा मृत्यु झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर सिक्कीमचे जिल्हा दंडाधिकारी श्रीराज यादव यांनी याबाबतची माहिती दिली.
मुकुटंग व युमथांग भागात डिसेंबर २०१८ पासून सातत्याने मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाली आहे. आतापर्यंत मुकुटंग भागात याकचे २५० मृतदेह सापडले असून युमथांगमध्ये ५० मृतदेह आढळले आहेत. मुकुटंगमधील १५ व युमथांगमधील १० कुटुंबांच्या मालकीचे हे याक आहे. हिमवृष्टीमुळे प्राण्यांना काहीच खायला मिळत नसल्याने उपासमारीमुळे त्यांचा मृत्यु झाला असावा, असे यादव यांनी सांगितले.

इंडो तिबेट सीमा पोलीस व जिल्हा प्रशासन याबाबत अहवाल तयार करीत आहेत. पशूसंवर्धन विभागाने वैद्यकीय पथक मुकुटंग येथे पाठविले आहे. जे याक जिवंत आहेत. त्यांच्यासाठी अन्न आणि चारा पाठविण्यात आला आहे. याकची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार आहे. ज्या कुटुंबांचे याक मृत्युमुखी पडले, त्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे यादव यांनी सांगितले.