३१ माकड आणि ११ कबुतर वायूगळतीमुळे मृत 

रायगड ; पोलीसनामा ऑनलाईन- रसायनी येथील पूर्वाश्रमीच्या हिंदुस्थान ऑग्रेनिक केमिकल (एचओसी) कंपनीत कार्यरत असलेल्या इस्रोच्या इंधन निर्मिती प्रकल्पात रसायनाची गळती होऊन माकड आणि पशुपक्षी अशा वन्यजीवांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे मृत प्राणी जमिनीत पुरून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न प्राणिमित्र आणि पर्यावरण प्रेमींच्या जागरूकतेमुळे फसला आहे.
वनखात्याने जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम केले तेव्हा ३१ माकडे आणि १४ कबुतरे मृतावस्थेत आढळली आहेत. त्यांचे शवविच्छेदन झाले असून अधिक तपासणीसाठी त्यांचे अवशेष मुंबईतील हाफकिन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एचओसी आणि बीपीसीएल कंपनीच्या सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसेच जेसीबीच्या चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या वायुगळतीचा परिणाम कंपनीतल्या दोन सुरक्षा रक्षकांवर झाल्याचेही समजते.
रसायनीच्या जवळपास कर्नाळा अभयारण्य असल्याने या वायुगळतीमुळे वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. यापुढील तपास वनक्षेत्राचे आरएफओ सोनवणे करीत आहेत.काल रात्री १० च्या सुमारास घडलेल्या या घटनेची कल्पना कंपनीने कुणाला हि दिली नाही . वन विभागानं ताब्यात घेतलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करनार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे . सुरुवातीला कंपनीने हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला असा हि आरोप करण्यात येणार आहे.