रत्नागिरी : भाट्ये किनाऱ्यावर लाटांचं तांडव ! नारळाची 35 झाडं उन्मळून पडली

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन –   रत्नागिरीमधील भाट्ये किनारी समुद्राच्या लाटांमुळं रत्नसागर बीच रिसॉर्टजवळ 35 नारळाच्या झाडांचं नुकसान झालं आहे. लाटांच्या तांडवामुळं ही झाडं उन्मळून पडली आहेत. ही झाडं पडल्यानं अर्धा किलोमीटर भागाची धूप झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी पावसाळ्यात भाट्ये किनाऱ्यावर हा प्रकार घडला आहे.

तीन दिवसांपूर्वीच रत्नागिरीतील भाट्ये किनाऱ्यावर समुद्राच्या भरतीचं पाणी आत घुसलं होतं. समुद्राच्या लाटा रिसॉर्टच्या बाजूनं आत घुसल्या होत्या. लाटा किनाऱ्यावर तीन मीटर आत आल्याचं पाहायला मिळालं आहे. इथली वाळू पाण्याच्या वेगानं समुद्राच्या दिशेनं वाहून गेली. भरतीच्या लाटांसोबतच एकामागे एक सुमारे 35 नारळाची झाडंही पडली.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार एका झाडाची किंमत ही अडीच हजार रुपये एवढी आहे. भविष्यात त्यापासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेतले तर सर्व झाडांचे मिळून एक ते दीड लाख होतात. म्हणजेच यामुळं एक ते दीड लाखांचा आर्थिक फटाक बसला आहे. गेल्या वर्षी भाट्ये किनाऱ्याची अशाच प्रकारे धूप झाली होती. त्यामुळं इथं सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलणं आवश्यक आहेत.

कोकणात नुकतंच वादळामुळं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं कोकणातील सुपारी, पोफळी, आंब्याची झाडं याशिवाय इतरही अनेक झाडं पडली आहेत. सोबत घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना याचा मोठा फटका बसला आहे.