काँग्रेस पक्षातील कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर, रायबरेलीत 35 नेत्यांचा राजीनामा

रायबरेली : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)
यांचा गड मानला जाणाऱ्या रायबरेतील ३५ नेत्यांनी आपला राजीनामा दिला असून, काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात आगामी काळात पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.

या ३५ पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवला आहे. पक्षात आता जुन्या सहकाऱ्यांना डावलले जात असून, पक्षात जुन्या नेत्यांचीही दखल घेण्यात येत नाही, असा आरोप होत आहे. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, इतर पक्षातून आलेल्या नेत्यांमुळे रायबरेतील पक्षाची अवस्था अमेठीसारखी होण्याची शक्यता वर्तवली आहे. तथापि, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी हे वृत्त फेटाळत त्यांच्याकडे कोणतेही राजीनामे आले नसल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या नवीन कार्यकारिणीत निष्ठावंतांना डावलून नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येत आहे. दुसरीकडे, ३० वर्षांपासून पक्षात काम करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. जिल्हाध्यक्ष स्वतःच्या चुका आणि कमतरता झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा प्रदेश सचिव व काँग्रेस कमिटी सदस्य शिवकुमार पांडे यांनी केला.

दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २०२४ मध्ये रायबरेलीत भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला होता. त्यानंतर काही दिवसांतच काँग्रेसच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे.