पालघर हत्याकांड : कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर जिल्ह्यात कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गडचिंचले येथे दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या झाल्यानंतर कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यमध्ये अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

16 एप्रिलच्या रात्री मुंबईहून गुजरातकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरु असताना या हत्याकांडामध्ये सहभागी असलेल्या सुमारे 400 ते 500 आरोपींपैकी पोलिसांनी आतापर्य़ंत 101 आरोपींना व 9 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपी हे जवळपास जंगलात व डोंगरामध्ये लपल्याची शक्यता असल्याने ड्रोनच्या मदतीने पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान कासा पोलीस ठाण्यात असलेल्या 35 कर्मचाऱ्यांची पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात इतरत्र बदली केली असल्याची माही पुढे आली आहे. जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कासा पोलीस ठाण्यात पाठवण्यात येईल असे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.