ऊस तोडणीसाठी ३५० मजुरांच्या टोळ्या दाखल

तासगाव : पोलीसनामा आॅनलाइन – सांगली जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटल्याने तासगाव तालुक्‍यात साखर कारखान्यांच्या ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या तसेच ऊस तोडणीची यंत्रेही दाखल झाली आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांचे गळीत हंगाम जोमाने सुरु झाले आहेत.

तालुक्‍यात आरफळ, टेंभू म्हैशाळ योजनेच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून उसाला मिळत असलेला चांगला दर यामुळे तालुक्‍यात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली. यावर्षी तालुक्‍यात अंदाजे 26 हजार हेक्‍टर एवढे उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे येथे ऊसतोडणी करण्यासाठी जिल्ह्यातील सोनहिरा, केनअॅग्रो यांचेसह क्रांती, सह्याद्री, उदगिरी, जयवंत, गोपूज, नागेवाडी, वर्धन अॅग्रो, विराज वसंतदादा, महांकाली आदी साखर कारखान्याच्या 350 टोळ्या कार्यरत आहेत. 400 टॅक्‍टरच्या माध्यमातून ऊस वाहतुक सुरु आहे. तसेच 455 बैलगाड्यांच्या माध्यमातूनही ऊसतोडणी व वाहतुक सुरु आहे. या कारखान्यांत जास्तीत जास्त ऊस आपल्यालाच कसा मिळेल यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. तर अजून येथे कृष्णासह इतरही काही कारखान्यांच्या टोळ्या दाखल होण्याची शक्‍यता आहे. तासगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा ओढा मात्र चांगला दर देणाऱ्या साखर कारखान्याला ऊस देण्याकडे असल्याचे दिसत आहे.
येथील कारखान्यांना का नाही परवडत शेतकरी संघटनेचा सवाल ?
गुजरातमधील साखर कारखाने प्रतिटन साडेचार हजार रुपयांपर्यंत दर देतात. मग राज्यातील कारखान्यांना का गुजरातप्रमाणे दर द्यायला परवडत नाही. ऊस दराचा प्रश्‍न आला की, येथील कारखाने साखरेला दर नसल्याचे तुणतुणे कायम वाजवतात. तर मग वीजनिर्मिती, आसवणी, इथेनॉल अल्कोहोल आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्प व बगॅस, मळी आदीतून साखर कारखान्यांना कोट्यावधी रुपये मिळतात ते कोठे जातात. हे कारखान्यांनी पहिल्यांदा स्पष्ट करावे. तेव्हा येथील साखर कारखान्यांनी आपले रडगाणे थांबवून शेतकऱ्यांच्या ऊसाला गुजराज पॅटर्नप्रमाणे दर द्यावा.
– बाळासाहेब पवार, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना,तासगाव
काही कारखान्यांकडून काटामारी !
तासगाव तालुक्‍यात दहा ते बारा साखर कारखान्याकडून ऊसतोडणी सुरु आहे. परंतु त्यापैंकी काही कारखाने राजरोसपणे काटामारी करीत असल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आल्या आहेत. तेव्हा वजनमापे विभागाने याची गांभीर्याने दखल घेवून साखर कारखान्यांचे वजनकाटे तात्काळ तपासावेत. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्वाखाली काटामारी करणाऱ्या साखर कारखान्याविरुध्द तीव्र हल्लाबोल आंदोलन करेल.
– अशोक माने,  शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष सांगली