6 वर्षात सशस्त्र पोलीस दलांच्या 433 जवानांनी केली आत्महत्या, 2019 मध्ये 36 जणांनी स्वतःला संपवलं : NCRB

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी) च्या ताज्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सशस्त्र पोलिस दलाच्या 36 जवानांनी आत्महत्या केली. गेल्या सहा वर्षांत अशा एकूण 433 घटना घडल्या आहेत.

जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सहा वर्षांच्या दरम्यान केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) 433 जवानांनी आत्महत्या केली. सन 2018 मध्ये आत्महत्येची सर्वात कमी 28 प्रकरणे नोंदली गेली, तर 2014 मध्ये सर्वाधिक 175 प्रकरणे नोंदली गेली. त्याच वेळी सन 2017 मध्ये अशा घटनांची संख्या 60, 2016 मध्ये 74 आणि 2015 मध्ये 60 होती.

गृहमंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असणाऱ्या सीएपीएफमध्ये सात केंद्रीय सुरक्षा दले असतात. त्यात आसाम रायफल्स व्यतिरिक्त सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस, शशस्त्र सीमा बल आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. एनसीआरबीच्या म्हणण्यानुसार 1 जानेवारी 2019 रोजी सीएपीएफमध्ये 9,23,800 कर्मचारी होते. हे दल सीमा संरक्षित करण्याव्यतिरिक्त अंतर्गत सुरक्षा राखण्यात आणि अवैध कामांना आळा घालण्यात केंद्र आणि राज्य सरकारांना मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात.