नाशिक जिल्ह्यात 36 हजार शिधापत्रिका रद्द

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – स्वस्त धान्य दुकानावर धान्य घेण्याकरीता न फिरकणाऱ्या लाभार्थी कुटुंबांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात येत आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तब्बल 36 हजार शिधापत्रिका रद्द केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली आहे. कार्ड रद्द झालेल्या लाभार्थी कुटुंबांना स्वस्त धान्य उपलब्ध होणार नाही. त्यासाठी त्यांना नव्याने सर्व पुराव्यांसह अर्ज करावा लागेल. नियमात असेल तरच धान्य मिळेल असे पुरवठा विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारकडून गरजू आणि गरीब लाभार्थींना स्वस्त धान्य पुरविले जाते. दर महिन्याला रेशन दुकानावर जाऊन लाभार्थीनी त्यांच्या हक्काचे धान्य घेऊन जाणे अपेक्षित असते. मात्र काही लाभार्थी रेशन दुकानांकडेच फिरकतच नसल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या पाच महिन्यांत अशा 36 हजार लाभार्थींनी स्वस्त धान्य घेतले नसल्याने त्यांची शिधापत्रिका रद्द केले आहे. बोगस शिधापत्रिका, स्थलांतरीत झाल्यानंतरही रेशनकार्ड रद्द न करणे आदीसह कारणांमुळे वाढीव रेशन धान्य शासनाकडून उपलब्ध होत असते. परंतु, प्रत्यक्षात अनेक लाभार्थी धान्यच घेत नाहीत. हे धान्य दुकानदारांकडेच शिल्लक राहात असल्याचे निरीक्षण पुरवठा विभागाने नोंदविले आहे. तर अनेक कार्डधारक धान्य घेण्यासाठी येतच नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात 1 लाख 74 हजार अंत्योदय कार्डधारक असून 6 लाख प्राधान्य कुटुंब लाभार्थी आहेत.