ऑपरेशन मुस्कान : पुणे पोलीसांकडून ३७ मुलांची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ‘ऑपरेशन मुस्कान’ या उपक्रमामध्ये एका महिन्यात ३७ मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. उत्तर प्रदेशातून त्या दोन अल्पवयीन मुली दोघा मुलांबरोबर पळून आल्या होत्या़. त्यांनी घरच्यांना आपला पत्ता लागू नये, म्हणून मोबाईलमधील कार्डही बदलले़ पण, त्यावरुन त्यांनी नकळत एक कॉल केला होता़. या एकुलत्या एक कॉलच्या धाग्यावरुन सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले़.

ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत डिसेंबर महिन्यात १५ अल्पवयीन मुले व २० अल्पवयीन मुली व २ सज्ञान मुली अशा ३७ मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले़.  ही कामगिरी करण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक अनिता खेडकर, उपनिरीक्षक अनंत व्यवहारे, सहायक फौजदार नामदेव शेलार, हवालदार प्रमोद म्हेत्रे, राजाराम घोगरे, नितिन तेलंगे, सचिन कदम, सुनिल वलसाने, रमेश लोहकरे, राजेंद्र कचरे, प्रदीप शेलार, तुषार आल्हाट, निलेश पालवे, संदीप गायकवाड, अनुराधा धुमाळ, ननिता येळे, कविता नलावडे, गितांजली जाधव, रुपाली चांदगुडे यांचा समावेश आहे.

याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातून पळून आलेल्या या दोन मुलींच्या शोधासाठी अन्य १० जणांची चौकशी करण्यात आली़. त्यांच्याविषयी काहीही माहिती नसताना केवळ एका फोन कॉलवरुन त्यांचा शोध घेण्यात यश मिळाले़. ते १५ दिवस पुण्यात मुलांच्या ओळखीच्या नातेवाईकांकडे रहात होते़. ही दोन्ही मुले बांधकाम व्यवसायात कामाला लागणार होती. पश्चिम बंगालमधून असाच एक अल्पवयीन मुलगा घरातून निघून पुण्यात आला होता़. तसेच गुजरातमधून बारामतीला नातेवाईकांकडे एक अल्पवयीन मुलगा आला होता़ पुन्हा घरी जातो, असे सांगून तो बारामतीहून निघाला व चुकला होता़.  त्याला रिमांड होममध्ये ठेवण्यात आले होते़.  त्याच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

ऑपरेशन मुस्कान –
गेल्या काही वर्षापासून हरवलेल्या व अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहिम महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केली आहे.

ऑपरेशन मुस्कानअंतर्गत हरविलेल्या बालकांचा शोध घेण्याबरोबरच सापडलेल्या बालकांची ओळख निष्पन्न करुन त्यांच्या पालकांचा शोध घेऊन बालक व त्यांचे पालक यांचे पुनर्मिलन घडवून आणण्याची ही कामगिरी केले जाते.  शहरात सिग्नल तसेच चौका-चौकात लहान मुले भिक्षा मागताना दिसतात. यामध्ये परराज्यातील मुलांचाही सहभाग आहे. यामुळे पोलिसांकडून अशा मुलांचा शोध घेतला जातो.