‘कोरोना’मुळं देशभरात 382 डॉक्टरांनी गमावला जीव, IMA नं केली शहिदांचा दर्जा देण्याची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) कोरोना संसर्गामुळे जीव गमावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचा आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी संसदेत उल्लेख न केल्याबद्दल आक्षेप घेत या संक्रमणामुळे जीव गमावलेल्या ३८२ डॉक्टरांची यादी बुधवारी प्रसिद्ध केली आणि त्यांना ‘शहीद’ असा दर्जा मिळण्याची मागणी केली.

आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी एका निवेदनात म्हटले होते की, सार्वजनिक आरोग्य व रुग्णालये राज्यांतर्गत येतात आणि त्यामुळे केंद्राकडे विमा भरपाईचा डेटा उपलब्ध नाही. त्यांच्या या निवेदनावर आयएमएने म्हटले की, हे आपल्या लोकांसाठी उभे राहणाऱ्या राष्ट्रीय नायकांचा त्याग आणि कर्तव्यापासून मागे हटण्यासारखे आहे.

असोसिएशनच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयएमएकडे १६ सप्टेंबर रोजी उपलब्ध कोविड-१९ च्या आकडेवारीनुसार आतापर्यंत २,२३८ डॉक्टरांना या आजाराची लागण झाली आहे आणि त्यापैकी ३८२ जणांचा मृत्यू झाला आहे. आयएमएने म्हटले की, कोणत्याही देशात कोरोना संसर्गामुळे इतक्या डॉक्टरांचा मृत्यू झालेला नाही, जेवढ्या डॉक्टरांचा मृत्यू भारतात झाला आहे. असोसिएशनने म्हटले की, जर सरकारने कोरोना संसर्ग झालेल्या आणि जीव गमावलेल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा ठेवला नाही, तर त्यांना महामारी अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा नैतिक अधिकार नाही.

कोरोना विषाणू भारतात वेगाने पसरत आहे आणि संक्रमितांची संख्या ५० लाखांवर गेली आहे. मात्र देशात रिकव्हरी रेटही सतत वाढत आहे आणि लोक जलद गतीने बरे होत आहेत. या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मात्र एक आशेचा किरणही दिसत आहे. भारताला या वर्षाच्या अखेरीस कोरोना लस मिळण्याची आशा आहे. रशिया भारताला कोरोना लसीचे १० कोटी डोस देईल. यासाठी रशियन सरकार समर्थित आरडीआयएफ आणि भारतातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यात करार झाला आहे.