जिल्ह्यात हत्तीरोगाचे 39 रुग्ण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत झालेल्या सर्वेक्षणात ऑगस्टअखेर नाशिक विभागात हत्तीरोगाचे २७२ रुग्ण आढळून आले आहेत. नगर जिल्ह्यात ३९ रुग्ण आढळले आहेत.

नाशिक जिल्हयात या वर्षी ८८, तर गेल्यावर्षी १०१ रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हानिहाय उपलब्ध आकडेवारीनुसर यंदा धुळे-३०, नंदुरबार-२७, जळगाव-८८, अहमदनगर- ३९याप्रमाणे हत्तीरोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. क्युलेक्स या डासाच्या मादीपासून हत्तीरोगाचा प्रसार होत असतो. निरोगी
व्यक्तीला डासाची ही मादी चावल्यानंतर साधारणपणेपाच वर्षांनी या रोगाचे दुष्परिणाम दिसून येतात.

हत्तीरोगाच्या निदानासाठी रात्रीच्या वेळी रक्तनमुना चाचणी घेणे आवश्यक ठरते. कारण या आजाराचे जंतू दिवसभर रुग्णाच्या हृदय आणि फुफ्फुसात वास्तव्य करतात व रात्री विश्रांतीच्यावेळी रक्तासोबत
शरीरात प्रवाहीत होतात. त्यामुळे सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेदरम्यान या आजाराच्या निदानासाठी रक्त नमुने घेतले जातात. मानवी शरीरात या जंतूंचे जीवनचक्र सहा ते सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळही चालते.