कोयत्याने सपासप वार करुन कॅशियरला लुटणाऱ्या चाैघांना अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – बँकेत पैसे भरायला निघालेल्या कॅशियरच्या डोळ्यात मिरची पूड टाकून, कोयत्याने वार करुन लुटणाऱ्या चौघांना निगडी पोलिसानी अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी दळवीनगर पुलावर घडला होता.

या प्रकरणी सुहास पांडुरंग मोहिते (४०, रा. प्राधिकरण निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. तर जावेद इद्रिस शेख (१९), मोहम्मद मुर्तुजा आकसापुरे (२२), दीपक कालिदास तेलंग (२२), विजय लहू शिंदे (१९) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास काळेवाडी येथील भारत गॅस एजन्सी मध्ये कॅशियर म्हणून काम करतात. गुरुवारी सव्वानऊच्या सुमारास गॅस एजन्सी मधील दोन लाख ५६ हजार ४५७ रुपयांची रोकड बँकेत जमा करण्यासाठी सुहास जात होते. ते दळवीनगर पुलावर एका गरीब महिलेस दहा रुपये देण्यासाठी थांबले. त्यावेळी दोन दुचाकीवरून वरील चार आरोपी आले. एकाने सुहास यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. दुसऱ्याने पाठलाग केला. तिसऱ्याने कोयत्याने वार केले. तर चौथ्याने पैसे लुटून नेले. निगडी पोलिसांनी तत्काळ चारही चोरट्यांना अटक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.