पुण्यातील रिक्षाचालकाच्या खून प्रकरणात चौघांवर ‘मोक्का’ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावकारी पैशाच्या वादातून पुण्यातील रिक्षाचालकाला मुळशी तालुक्यातील रावडे गावाजवळ नेऊन त्यांचा खून करणाऱ्या चौघा सराईत गुन्हेगारांवर ग्रामीण पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. विशाल अशोक देसाई, अंकुश राम गोणते (वय ३०), सूरज अशोक ढोकळे ( वय ३३, रा. सुतारदरा) यांना अटक केली, तर चौथा आरोपी योगेश ऊर्फ पप्पु प्रकाश दाभाडे हा फरार झाला आहे.

त्यांच्यावर  पुणे शहर, मुळशी तालुका व परिसरात गुन्हेगारांची टोळी निर्माण करून खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, गर्दी, मारामारी करून दहशत निर्माण करत गुन्हेगारी वर्चस्व निर्माण केलेले आहे. सूरज ढोकळे व त्याच्या इतर साथीदारांवर १२ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत.

मुळशी तालुक्यातील रावडे गावाच्या हद्दीत १३ मे रोजी पौड पोलिसांना एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. त्याच्या कपड्यावरुन तो रिक्षाचालक असल्याचे लक्षात आले. त्यावरुन मयूर मारुती भागवत (वय ३९, रा. एरंडवणा, कर्वे रोड, पुणे) यांचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

यात मयूर भागवत याने विशाल अशोक देसाई (रा. कर्वे नगर) यांच्याकडून पैसे घेतल्याची माहिती पुढे आली. त्यावरुन पौंड पोलिसांनी विशाल देसाई, सुरज ढोकळे, अंकुश गोणते यांना अटक केली होती. या गुन्ह्यातील आरोपींना पकडून त्यांना मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी पौड पोलिसांनी पाठविण्यात आलेला प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. पुुढील तपास हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील या करीत आहेत.